Wednesday, October 18, 2023

लहान्याला समजलं

 लहान्या शाळेतून घरी चालला होता. हौदापर्यंत पोचला आणि गम्मतच दिसली त्याला! बैलच बैल. मस्त रगडून अंघोळ घालणे सुरु होते बैलांना. लहान्याला एकदम आठवलं! शाळेत पहिल्या तासाला तो मोठ्या आकाराचा माणूस ‘शेतकरी बैलात पोळा तत्व’ की ‘शेतकरी पोळ्यात बैलतवं’ की असलंच कसलंतरी काहीतरी समोरच्या खुर्चीवरून मोठ्याने बोलत होता. ‘बैलपोळा उद्या!’ लहान्याला समजलं. त्याचा बापण मालकाचे बैल धूत होता. लहान्या समोरच्या पारावर चिंचेला टेकून बसला. एक बैल जरा दंगा करत होता. एक मागे शांत बसला होता. चार-पाच बैल हौदाच्या एकदम जवळ पाण्याची मजा घेतल्यासारखे अंघोळ घालून घेत होते. लहान्याचा बा धूत होता तो बैल पोटाजवळ पायाशी घासायला गेलं की पाय उचलून नाच करत होता. ‘काखेत गुदगुल्या!’ लहान्याला समजलं. 

आपल्याकडेही पाहिजे होते पाच-सहा बैल, असं काहीसं मनात येत असताना लहान्या चिंचेच्या खोडाशी स्वतःची पाठ जुळवून घ्यायला लागला. पाच-सहा जरा जास्तच होताहेत, एकतरी बैल पाहिजे होता, अशी तडजोड मनाशी करत त्याने पाठ खोडात मस्तपैकी बसवली. डोकं मागे टेकता टेकता त्यात शंका आली, ‘पाच-सहा म्हणजे पाच-सहा असतात, एक म्हणजे एक असतो, हे मला समजलंय हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसाला समजलंय की नाही?’ 

ह्या पुढेही विचार येतच होते पण तेवढ्यात दोन बैल त्याच्या दिशेनं यायला लागले! तो बघतच राहिला! त्यांनी त्याला हौदावर नेऊन घासून अंघोळच घातली. त्यालाही काखेत गुदगुल्या झाल्या. तो काय काय सांगत होता त्या बैलांना पण त्यांना ते समजत नव्हतं. शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसासारखेच वाटले त्याला ते. त्यांच्या पुढच्या दोन पायांचे मधेच हात होते, मधेच पाय. 

त्यांनी लहान्याला वाळू दिलं. थंडीच वाजली त्याला जरा तेव्हा. तो त्यांना तसं सांगत होता पण त्यांना ते समजत नव्हतं. शाळेतल्या समोरच्या खुर्चीची आठवण लहान्याला होणार तितक्यात त्यांच्या पुढच्या पायांचे हात झाले. त्यांनी लहान्याचा भांग पडला. मधोमध. केसांचे झालेले दोन भाग त्यांनी चक्क झेंड्याच्या रंगात रंगवले. दोन झेंडे! आणखीन त्यावर त्यांनी लावले दोन गोंडे! ‘मला झेंडे-गोंडे असे शब्द येतात हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसाला येतं की नाही?’ अशी शंका लहान्याला तिथेही येऊन गेली. 

तेवढ्यात बैलांच्या हातांचे पाय झाले, ते चालत एका घरात गेले आणि एक पिवळं चमचमतं, छोट्या चादरीच्या आकाराचं कापड तोंडात धरून घेऊन आले. त्या कापडावर बरोबर मध्यात पताकांच्या आकाराचे निळे तुकडे चिकटवले होते. मुली नाचायला फेर धरून गोलात उभ्या राहतात तसे लावले होते ते. हे कापड बघता बघता लहान्याच्या डोक्यात शंका अली, ‘मला हे सगळे आकार माहीतीयेत हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसाला माहितेय की नाही?’

बैलांनी लगेचच ही शंका चमचमत्या कापडानं झाकून टाकली. लहान्या जरा वैतागलाच. ते परत जाऊन प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा घेऊन येत होते. चड्डीचं काय?? लहान्या ओरडणारच होता पण त्याला आठवलं की त्यांना काही समजत नाही, शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या… 

बैलांच्यात पहिलीतल्या मुलांना चड्डी घालत नसतील, लहान्यानं स्वतःला समजावलं. तोवर त्याच्या गळ्यात प्लास्टिकफुलांच्या माळा आणि पायात घुंगरू आले होते! आता बैलांचे हात आणि हाताचे पाय भरभर अदलाबदली करत होते. लहान्याच्या कपाळावर, पाठीवर गुलालाने चित्र काढली जात होती, मधून मधून काहीतरी खायला घालत होते, आजूबाजूला आणखीन बैल गोळा होत होते, … 

तिघा बैलांनी लहान्याजवळ मागच्या पायांवर उभं राहून पुढच्या हातांनी एक ढोल आणि दोन ताशे वाजवायला सुरुवात केली तेव्हा मात्र लहान्याला गरगरायला लागलं. त्यानं तिथून निघून जायचा प्रयत्न केला तेव्हा काही बैलांनी त्याला चिंचेच्या झाडाला दोरानं बांधून ठेवलंय हे त्याच्या लक्षात आलं. त्याला पुन्हा शाळेतली समोरची खुर्ची आठवली! बाकी मुलं कुठं दिसतात का ते शोधू लागला मग तो. 

तेवढ्यात ते आधीचे दोन बैल आरशांचे अनेक तुकडे लावलेलं काहीतरी घेऊन आले आणि थेट लहान्याच्या तोंडावरच बांधलं! दोन डोळे आणि एक नाकासाठी तीन भोकं होती फक्त! बाकी बंद सगळीकडून! दोन भोकातून थोडं थोडं बाहेरचं जग बघताना लहान्याच्या डोक्यात शंका आली, आपल्याला तरी हे दिसताहेत थोडे, पण हे आपल्याकडे आले तरी ह्यांना हेच दिसतील आरशात! हे आपल्याला समजून घेऊच शकणार नाहीत आता, अशी खात्री पटली लहान्याला. शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या मोठ्या आकाराच्या माणसाबद्दल एवढं खात्रीलायक नाही सांगता आलं त्याला. त्या गोंधळातही जरा बरं वाटलं त्यामुळे त्याला. 

गोंधळ वाढत होता, आता लहान्याला गावातल्या मोठ्या घरांवरून हिंडवायला सुरुवात झाली. ढोल, ताशे आणि अनेक बैल नाचत गात, गुलाल उडवत त्याला नेत होते. गोंगाटात इतर मुलांनाही नेत आहेत असं मधेच त्याला वाटून गेलं. घरासमोर त्याला उभं केलं की घरातून बैल बाहेर येऊन त्याची गुलाल लावून पूजा करून, त्याला खायला घालून, त्याच्या शेजारच्या बैलाला पैसे देत होते. बैलांना पैशाचं काय, मला दिले तर मी पाणीपुरी खाईन, लाईट वाली पेन्सिल घेईन, … डोक्यात हिशोब लावता लावता त्याला शंका आली, मला हिशोब येतो हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या …

गोंगाटामुळे शंका पूर्ण झाली नाही. त्याला खूप तहान लागली होती पण सगळे खायलाच देत होते, कोणी पाणी नव्हतं देत. तहान, ढोल, ताशे, नाच, गाणी, … असह्य झालं त्याला सगळं!  अंगातली सगळी शक्ती एकत्र करून आता जोरात बोंबलावं आणि थयथयाट करावा असं ठरवून त्यानं जोरात छाती भरून श्वास घेतला आणि बोंबलणार तेवढ्यात …


… तेवढ्यात त्याचे डोळे उघडले! समोर हौदावर मस्त रगडून अंघोळ घालणे सुरु होते बैलांना…!


इतकं हुश्श कधीच झालं नव्हतं लहान्याला! माझ्याकडे एकही बैल नाही हेच बरंय, नाहीतर मीपण त्याला असं वागवलं असतं- लहान्याला समजलं!

पण मला हे समजलंय हे शाळेतल्या समोरच्या खुर्चीतल्या … छे! शंका येऊ न देताच त्यानं खोडात पसरलेली पाठ बाहेर काढून स्वतःला उभं केलं आणि घराकडे निघाला. 

Thursday, October 5, 2023

अमोल, अनू, अत्तू, अडबड असे चौघं गेले अमळनेरला. ‌अमळनेरला अडबडला अलगच फळ दिसलं. अडबड लागला गडबड करायला. “अरे अमोल, अगं अनू, अरे अत्तू, हे बघा अलगच फळ, अलगच फळ, अलगच फळ!” 

“असं काय! बघू बघू…?” अमोल, अत्तू. 

“अलगच फळ!” अमोल. 

“अरे होना!” अत्तू. 

“अगं बघ ना!” अडबड. 

“अरे नाव असेल की काहीतरी ह्याचं!” अनू. 

“असेल असेल” अत्तू. 

“विचार नं त्यांना!” अमोल. 

“अरे दादा, ह्याचं नाव काय?” अडबड. 

“अननस” दादा. 

“अननस??!!” अत्तू. 

“अरे बापरे! अननस?! असं नाव असतं?!” अडबड. 

“अननस असं असतंय होय!!!” अनू. 

“अलगच असतंय!” अमोल. 

“पहली बार देखा?! रुको! अपुन काटके देता टेस्ट करो बच्चो थोडा थोडा.” दादा. 


-तुम्ही खरं अननस दाखवून गोष्ट सांगा आणि मग कापून खाऊन टाका! 😍

गोष्टीत फक्त ‘अ’ आहे. ‘आ’ वगैरे काही मुद्दाम वापरलं नाहीये. गोष्ट कितीही वाढवू शकता हे लक्षात आलं असेलच तुमच्या. 😊



मुलांच्या भावविश्वातले-

असं

अलग

अगर

अगरबत्ती

अहिरणी

अख्खा

अर्धा

अमर

अजगर

अनुक्रमणिका (शाळेत खूपदा ऐकत असतील)

असर

अक्कल

अमूल (कंपनी)

अवघड

अरे

अरेरे

अती

अच्छा

अब्बा

अम्मी

अप्पा

अडकला

अटकन

अजूबा (जादूवाला बोलत होता त्या दिवशी हा शब्द)

अगं

अय्या

अत्तर

अढी

अफवा

अर्थ

अठ्ठी

अण्णा

असेल, असू दे

अळी

अशी

अवयव

अल्ला

अक्षर


मुलांच्या भावविश्वात नसलेले पण तरी कधीतरी वापरायला-

अव्वल

अगदी

अछूट

अखेर

अन्य

अग्नी

अन्याय

अटल

अलगद

अनुभव

अरण्य

अचल 

अमल

अदब

अभय

अतिरेक

अनुक्रम

अष्ट

अगणित


मुलांची आणि गावांची नावं तर काहीही ठेवू शकतोच-

अमोल अनु अवी अनिश अविनाश अनामिका अनघा अलका अप्पू अनिता अरबाज अली अझहर अमळनेर अल्फिया अमरपूर अलिगढ …

Friday, September 29, 2023

PoCRA


शेतकरीदादा तुला काय पाहिजे??

राजम्याला चार बार पाणी पाहिजे!


शेतकरीदादा पाणी येणार कुठून?!

जमिनीतून बाबा जमिनीतून!

शेतकरीदादा जमिनीत पाणी किती??

ते कसं सांगू बाबा नाही माहिती!

शेतकरीदादा आधी पाऊस मोजू,

मग तुझ्या गावातली माती बघू,

मातीत मुरेल ते रबीत उरेल,

तुला पुरेल की त्याला पुरेल??


शेतकरीदादा तुला काय पाहिजे??

राजम्याला चार बार पाणी पाहिजे!


शेतकरीदादा पाणी किती आहे रे?

पवसाचं मुरलंय तितकं रे!

शेतकरीदादा पाणी तुझं आहे का?

माझं त हाय… पण त्याचंबी हाय…

कुणाचं किती रे कुणाचं किती?

ते कसं सांगू बाबा नाही माहिती!

शेतकरीदादा तुला नीटच कळेल,

तुला मिळेल अन त्यालाबी मिळेल! 

सर्वांना पुरलं तर पाहीजे ना,

मग थोडं गणित शिकून घे ना!

आशा संपतेय

नाचवा ह्यांना चोवीस तास

पोचवा मंडळांना भरपूर निधी

मानवा कर्कशतेत सार्थकता

फिरवा गरगर लखलख

पटवा हाच तो आनंद

जगतील मग ते दहा दिवस अन् चोवीस तास
आवाजाने
झगमगत

बघतील मग त्यांच्या खऱ्या गरजांकडे
बधीरतेने
डोळे दिपून

Monday, September 18, 2023

अख्खाच्या अख्खा (घग्या - २)

एक असतो घग्या. त्याची बायको घगी. त्यांचा मुलगा घगल्या आणि मुलगी घगली. त्या सगळ्यांनी मिळून शेतात मुळा लावलेला असतो. लांबच्या लांब मुळे जमिनीखाली तयार व्हायला लागलेले असतात. एक दिवस घगल्या-घगली शाळेला जायला निघतात तेवढ्यात मागून आईची हाक येते. “घगल्या! घगली!” दोघं वळून बघतात तर आई शेताच्या दिशेनं बघत असते. शेताकडून बाबा घाईनं घराकडं येत असतो. घगली बघते- बाबाच्या हातात लांब मुळा! सगळे एकमेकांजवळ पोचल्यावर घग्या म्हणतो, “एवढे मोठे मुळे आलेत, एक न्या की शाळेत. द्या की टीचरला.” घगल्या खुश! शाळेत शायनिंग! तो पटकन दप्तर पाठीवरून काढून उघडतो, मुळा भरायला. त्याची घाई बघून घग्या बजावतो, “हळू की! अख्खाच्या अख्खा दे मुळा टीचरला! तोडू नको! घाई नको!” मग सगळे मिळून अलगद मुळा दप्तरात ठेवतात. तिरका. देठाचा भाग आत. वह्या पुस्तकं पुढे मागे करून. निमुळता भाग दप्तराच्या वरच्या एका कडेनं थोडा बाहेर काढून. मग घग्या दप्तर उचलून धरतो आणि घगल्या हळूच दोन्ही हात पट्ट्यांत सरकवून दप्तर पाठीवर घेतो. “नीट जा काय!” घगी म्हणते आणि पोरं शाळेकडं निघतात. निघतात म्हणजे निघतातच! मुळा तुटू नये म्हणून घगल्या ताठच्या ताठ चालतोय आणि घगली नेहमीच्या टवाळ्या करत ‘घगल्या चड्डीत शी झाल्यासारखा चालतोय’ म्हणून स्वतःशीच हसतेय. घगली झाडावरच्या चिंचा बघतेय, रस्त्याकाठचा कचरा बघतेय, समोरच्या घरातलं वाळवण बघतेय, मागून येणारा मुळा-रक्षक सैनिक बघतेय… घगल्या नुसते डोळे फिरवून दिसतंय तेवढंच बघत नाकासमोर सरळसोट चाललाय. त्यानं मान वळवली तरी चालणारे हे कळतंय त्याला, पण वळत नाहीये. अचानक डोळ्याच्या उजव्या खालच्या कोपऱ्यातून त्याला एक खूपच बुटकी घगली पाहिल्याचा भास होतो! परेडचा अबाउट टर्न करून तो नीट बघतो तर घगली रस्त्याकाठच्या कचऱ्यात काहीतरी बघत खालीच बसलेली! “घगल्या बघ ना! चिकटपट्टी! अर्धी तशीच आहे! कोणीतरी अर्धी चांगली फेकून दिली! घेऊया का?” “नाही! चल!” घगल्या ताठ मानेनं नकार देतो. “अरे फेकूनच दिलीये ती! फेकूनच राहणार ती इथे! आपण तिला घरी न्यू! छान ठ्यू!” म्हणत ती चिकटपट्टी चटकन दप्तरात टाकते आणि घगल्याच्या अबाउट टर्नचा अबाउट टर्न होईतो उड्या मारत त्याला ओलांडून पुढं निघते. दोघं शाळेत पोचतात तर चिंचेच्या झाडाखाली सगळी पोरं जमून वर बघत एकच कालवा करत असतात. दोघं धावत वर्गात दप्तरं टाकून पोरांच्या गर्दीत घुसतात. झाडावर चार माकडं! त्यामुळे झाडाखालच्या चाळीस वंशजांचा नुसता धुडगूस! शेवटी टीचरच्या टाळ्या ऐकू यायला लागतात तेव्हा पोरं भानावर येतात. घगल्या-घगली तर चौपट भानावर येतात! मुळा! अख्खा! मघाशी घाईत वर्गात दप्तर फेकलं! पुन्हा दोघं धावत वर्गात! घगल्या घाबरत दप्तर उघडतो. मुळ्याचे दोन तुकडे! तो बघतच राहतो नुसता! घगलीपण गप्प एकदम. तिच्या डोळ्यातून पाणी येणार तेवढ्यात डोक्यातून आयडिया येते! घगल्याला धरून गदागदा हलवत ती ओरडतेच! “चिकटपट्टी!” घगल्यापण मग रडायऐवजी हसायलाच लागतो! घगली चिकटपट्टी दप्तरातून काढेपर्यंत तो दोन्ही तुकडे बरोब्बर जुळवून मुळा धरून बसतो. इतकं बरोब्बर जुळवून की चिकटपट्टीच्या सुरुवातीसारखीच मुळ्यावरची तुटलेली भेगही सापडतच नाही घगलीला पटकन! चिकटपट्टीचं टोक मुळ्यावर चिकटवून, घगल्याच्या दोन्ही हातांच्या मधून पुन्हा पुन्हा चिकटपट्टीच्या गोल गोल गटांगळ्या मारत घगली शेवटी मुळा गच्च चिकटवते. दोघं पुन्हा धावत बाहेर जातात, टीचरला शोधतात आणि मुळा देतात. अख्खाच्या अख्खा! (वस्तीवरच्या एका वर्गात एका दादानं घग्याची गोष्ट मुलांना सांगितली. त्या मजेदार गोष्टीत घग्या, घगी, घगल्या आणि घगली शेतात मुळा कसा लावतात, मग लांबच्या लांब मुळे जमिनीतून ओढून कसे बाहेर काढतात आणि मग ते कसे खातात असं सगळं वर्णन आहे. त्या गोष्टीचा लेखक माहीत नाही. पण त्या अनामिकाला सलाम! आणि गोष्ट सांगणाऱ्या दादालाही सलाम! कारण ती गोष्ट ऐकून दुसऱ्याच दिवशी सुचली ही घग्या-भाग-२!) ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- This is a telling story. Hence the following poem. Children like to sing it along as the story progresses. Also, the story can be elaborated depending on children's interest. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दप्तरात ठेवले मुळ्याला

मुळा द्यायचा टीचरला

घगल्या चालला शाळेला

घगली चालली शाळेला

रस्त्यात भेटली चिकटपट्टीला

दप्तरात टाकली चिकटपट्टीला

घगल्या पोचला शाळेला

घगली पोचली शाळेला

दप्तर टाकले बाजूला

गेले सगळे खेळायला

पाहिले जेव्हा टीचरला

एकदम मुळा आठवला

पण दप्तर उघडून पाहतो तर…!

मुळा होता तुटलेला!


घगलीला आली आयडिया!

दप्तरातून काढली चिकटपट्टीला

चिकटून दिला मुळ्याला

मुळा दिला टिचरला!


Saturday, September 16, 2023

कणीक

काल चोपडा-जळगाव बस एवढी गच भरली होती की आठ लोकात एक घाम येत होता. पाय ठेवायला जागा नव्हती. तरिही नीट उभे राहता येत होते. 


बसहून दुप्पट आकारमान होते स्टॅंडवरच्या माणसांचे. आणि तरी, बस आल्यावर क्षणार्धात त्या सगळ्यांची आणि बसच्या दाराची मिळून एक गच्च कणीक मळली गेली आणि मग ती कणीक डावीउजवीकडून दाबून दाबून दाराच्या पलिकडे चढत सरकत बसमध्ये मावली!


आपल्या तोंडातला वेलदोडा आपण चघळतोय की दुसरा, आपला फोन आपल्या की दुसऱ्याच्या खिशात आपण की दुसऱ्याने ठेवला, आपले काही अवयव हरवलेत की जास्तीचे आलेत, आपले विचार आपल्याला येताहेत की दुसऱ्याला, असे प्रश्न निर्माण होत होते. 


पुढच्या स्टॅापला एकोणतीस लोक उतरले तरी बसमध्ये तेवढेच लोक होते. 


सगळ्यांची उंची काही इंचांनी वाढली असणार. सगळीकडून एवढे दाबलेले वरून निघाले असणार.


जळगाव स्टॅंडला एक मित्र ॲक्टिवावर घ्यायला आलेला दिसला. ही एवढाली गच्च कणीक आता ॲक्टिव्हावर कशी मावणार असा प्रश्न निर्माण झाला.  तेवढ्यात बसचे दार उघडले आणि क्षणार्धात कणकेची माणसे झाली! मला स्वत्वाची जाणीव झाली. प्रश्न सुटला.

Thursday, August 17, 2023

Children conduct class at Doorstep settlement

1 August 2015

Batch2 went to a more underprivileged settlement and took sessions for the children there. They planned everything, took all the material with them and conducted the class on a footpath on the road near the temporary settlement. They didn’t have water and electricity. Temporary huts. Doorstep taught there. We went through them. Batch2 was later talking about so many issues. ‘We thought we were poor, diidii. But they are way poorer than us!’